SUNDARGAD (DATEGAD)
नमस्कार दुर्गवेड्या दुर्गभटक्या मित्रानो.
आज मी अत्यंत सुंदर अश्या सुंदर गडाविषयीचा ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीस आलो आहे. सुंदरगड हे महाराजांनी ठेवलेले नाव असावे. त्याचे पहिले नाव दातेगड असे होय. प्रत्यक्ष गडावर जाईपर्यंत मी सुद्धा याला दाते गड असेच संबोधित होत्तो भेटीअंती मला ह्या सुंदरगड नावाचा साक्षात्कार झाला. गडाला मी दिनांक २३ फेब २०२० ला भेट दिली. असो. ह्या गडाचे मुख्य आकर्षण म्हणजे गडावर असलेली तलवारीच्या आकाराची विहीर.
हा किल्ला सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात आहे. सातारा चिपळूण रस्त्यावर पाटण पासून उजवीकडे ह्या किल्ल्याला फाटा फुटतो. एकदा का सातारा कोल्हापूर ह्या हम रस्त्यावरून आत गेले कि आपण एका नव्या जगात आल्याचा अनुभव येतो. मला तर एखाद्या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणा ला भेट देत असल्याचा भास झाला.
मुंबई हुन मी सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची मोहीम आखली होती. त्याअंतर्गत मी सुंदरगड ला भेट देण्यायाठी निघालो. आदल्यादोन दिवशी चंदन, वंदन कल्याणगड, महिमानगड आणि भूषणगड अश्या किल्ल्यांचा दौरा आटोपून सातारला मुक्काम केला होता. सकाळी सूर्य वर यायच्या आत प्रवासाला सुरवात केली. गूगल ने मला ठोसेघर वरून जायची OPTION दाखवली होती पण हा हमरस्ता इतका डोक्यात बसला होता कि मी गुगळे काकांकडे दुर्लक्ष करून हमरस्त्यावरून निघालो आणि एका निसर्गरम्य अश्या प्रवासाला मुकलो. असो.
पाटण गावातून आत गेल्यावर मला ध्यानी मनी नसताना आमदार पाटणकरांचा वाडा लागला, वाडा काय प्रत्यक्ष किल्लाच आहे तो. माझ्या पायाने सूचना मिळायच्या आत ब्रेक दाबून गाडी उभी केली. गाडी बाजूस लावून दोन ढांगात पायऱ्या ओलांडून त्या भुईकोट किल्ले वजा गढी च्या महादरवाजातुन मी प्रवेश केला. दारावरील शिपायाने मला आधी वर्दी असल्यासारखे नमस्कार करून आत प्रवेश दिला. हि गढी पूर्णपणे शाबूत असून त्यामध्ये अत्यंत सुन्दर असे गणपतीचे मंदिर आहे. मंदिरात पाटणकर घराण्याची वंशावळ एका तक्त्यावर दिली आहे. ती नजरे खालून घातली. दरवाजाचे बुरुजांचे फोटो काढून पुढच्या प्रवासाला म्हणजे सुंदरगडा कडे निघालो. येथून पुढे खरा प्रवास सुरु होतो. रास्ता एकदम उत्तम होता परंतु वळणे वळणे फारच. गुगळे काका जरी रास्ता दाखवत असले तरी रस्त्यावर खुणा नसल्याने आणि रास्ता निर्मनुष्य असल्यामुळे मनात धाकधूक होतीच. जसा पुढं पुढे जाऊ लागलो तेव्हा कसल्यातरी खुणा पटायला लागलया. मी ऐकून होतो कि माझे पणजोबा ह्या भागात पूर्वी तलाठी का कायश्या हुद्द्यावर होते. माझ्या आजोबांचे लहानपण ह्या भागात गेले होते. (नंतर घरी गेल्यावर वडिलांशी बोलताना ह्या गोष्टी ला दुजोरा मिळाला.).
दूरवर मला एक म्हातारबुवा जातं दिसले. त्यांच्यापाशी पत्ता विचारायला म्हणून मी थांबलो. त्यांनी मला सुंदरगड म्हणा म्हणजे घोळ होणार नाही असे सांगितले. गृहस्थ थोडे थकलेले वाटले म्हणून मी त्यांना लिफ्ट दिली आणि बऱ्याच पुढे वाटेवर सोडले. आजूबाजूंच्या डोंगराचे कडे इतके ताशीव होते कि तटाचा भास व्हावा. काही ठिकाणी काम चालू असल्याने बरेच फिरून फिरून जावे लागले. पण एकदाचा गड दृष्टोपत्तीस पडला आणि मी श्वास सोडला. माझ्या पुढे मागे एकदोन अजून गाड्या दिसल्या. बाकीचं लोक पुण्यावरून आले होते. नवीन बांधलेल्या एका हॉटेल जवळ गाडी पार्क करून मी तयार झालो. तेथे जमलेल्या लोकांच्या ओळखी करून घेतल्या.
गडाचे मुख्य प्रवेशद्वार मागच्या बाजूस म्हणजे पश्चिमे कडे आहे, प्रचलित वाट मात्र पूर्वेस आहे. वळणा वळणा रस्त्यावरून गर्द झाडी तुन आम्ही निघालो. जाताना लाल माती मुळे महाबळेश्वर चा भास होत होता.. आम्ही एका पडझड झालेल्या बुरुजातून आत प्रवेश केला. आत प्रवेश केला म्हणजे मी एका नवीन विश्वातच प्रवेश केला. गडाचे पठार थोडे उंच सखल होते. सर्वत्र तांबूस रंगाचे गावात पसरले होते. त्यादिवशी दुर्गपुजन दिवस असल्याने किल्ल्यावर बर्यपैके गर्दी होती. सुंदर गड संवर्धन समितीचे कार्यकर्ते आणि श्री निलेश फुटाणे व राहुल खैरमोडे यांची गाठ पडली. त्यांनी गडाची माहिती आणि इतिहास सांगितला.
तलवारीच्या विहिरीत उतरायला पायऱ्या आहेत. पाण्याच्या जवळ गेल्यावर डाव्या बाजूला एक छोटे मंदिर आहे. पाण्याजवळचे तापमान बऱयापैकी कमी आहे. तेथे रमत असतानाच वरून आवाज आला. कार्यकर्ते आम्हाला प्रवेश द्वारात बोलवत होते. विहिरीच्या जवळ जरा काळजीपूर्वक हिंडावे कारण विहिरीला कठडा नाही. बाहेर येऊन दरवाज्यात जमा झालो. दारातच मारुती आणि गणपतीची महाप्रचंड मूर्ती आहे, नवल ह्याचे वाटते कि एवढ्या हस्तांतरणात ह्या मूर्ती शाबूत आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरवातीपासून किल्ला जरी बहामनी आणि आदिलशहाच्या ताब्यात होता तरी येथील देशमुखी पाटणकरांच्या कडे होती. अफझलखानाच्या वधानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दिग्विजयात शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला आणि गडाचे नाव सुंदरगड ठेवले. संभाजी महाराजांच्या वधानंतर काही काळ गड मुघलांच्या ताब्यात होता. परंतु १६८९ च्या सुमारास हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. सन १८१८ च्या सुमारास कॅप्टन डफ ने हा किल्ला इंग्रजांकडे वर्ग केला.






