SATARA TOUR - PANDAVGAD, VAIRATGAD, VARUGAD AND SUBHANMANGAL
पांडवगड, वैराटगड वारुगड आणि सुभानमंगळ मोहीम.
नमस्कार मित्रांनोआपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉग मध्ये. लिहिणे हा काही माझा स्थायी भाव नाही परंतु लिहिण्याची आवड आणि ट्रेकिंग चा छंद काही गप्प बसू देत नाही.
सर्वप्रथम सांगू इच्छितॊ कि यातील ऐतिहासिक माहिती मी नेटवरून किंवा मी वाचलेल्या पुस्तकातून गोळा केलेली आहे. सर्व इतिहास स्वतःला गोळा करता येत नाही. गुगल मॅप्स असल्याने मी येथे पोचायचे कसे वगैरे लहून लेख वाढवला नाही. दुसरे म्हणजे बारीक सारीक तपशील दिला नाही जसे जी डावीकडे वेळा थोडे वर जावा. सर्व प्रवास माझ्या गाडीने केला त्यामुळे ST च्या वेळा स्टॉप वगैरे यात आले नाही. असो.
माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये लिहिल्याप्रमाणे माझे बालपण अजिंक्य तारा किल्ल्याच्या परिसरात गेले आणि आजूबाजूचे वाटावरणामुळे मला ट्रेकिंग ची आवड निर्माण झाली. बालपण जरी सातारला गेले असले तरी सातारा परिसरातील किल्ले पालथे घालण्याकरता बराच काळ जावा लागला. अखेर तो दिवस उजाडला मार्च १४ २०१६ साली. बऱ्याच दिवसांचा पाठपुरावा आणि इच्छा पूर्ण होण्याची चिंन्हे दिसू लागली.
इरादा होता सातारा जिल्ह्यातील शक्य तितके किल्ले पूर्ण करण्याचा, पण उपलब्ध असलेला वेळ आणि मित्रांची उपस्तीथी लक्षात घेऊन शेवटी पांडवगड; वैराटगड; वारुगड आणि सुभानमंगळ किल्ला प्लॅन केला. मी स्वतः आणि माझे मित्र (प्रवीण कांबळे; ओंकार आणि गणेश नवले) तयार झाले.
१३ तारखेला ठीक ११ वाजता रात्री खारघर वरून सुरवात केली माझ्या महिंद्रा XUV मधून आणि मजल दरमजल करीत पहाटे चारच्या सुमारास पांडवगडाच्या पायथ्याला गुंडेवाडी गावात पोचलो. ड्रायविंग चा सर्व ताण माझ्यावरच पडला होता. टोल नाक्यावर मिळणारा चहा घेत घेत गुंडवाडी गावात पोचलो. रस्त्याच्या बाजूला एका शाळेजवळ गाडी पार्क करून मिळेल तेव्हडी झोप पदरात पडून घेतली. आमच्या रात्रीची सुरवात नवी मुंबईत झाली होती आणि पहाट आणि दिवसाची सुरवात वाई च्या जवळ पांडवगडाच्या कुशीत झाली. आणि ती सुद्धा पक्ष्यांच्या मंजुळ आवाजाने. बऱ्याच दिवसांनी असे मधुर किलबिल स्वर कानावर पडले. अजून अंगावर पूर्ण मोहीम होती पण रात्रीचा थकवा आणि अपुरी झोप काही डोळे उघडू देईनात . अश्या वेळी जे व्हायचे तेच झाले. एक जण उठला आणि सगळ्यांना जागे करून परत झोपला. हळू हळू गावाला सुद्धा जग येऊ लागली. शाळेचे विद्यार्थी येऊ लागले आणि मग उपायच खुंटला. तयार झालो; सर्व सोपस्कार उरकले. काही मुलांशी गप्पा मारल्या. येथे शाळेत एक अभिनव पद्धत बघितली. प्रत्येक विद्यार्थी एक इंग्लिश शब्द शर्टाच्या खिशावर लावून आला होता. आणि मग सगळ्यांचे बघून एक शब्द सहज तयार होतो. अभिनव.
शाळेच्या जवळची वस्ती ओलांडून आणि मांढरदेवीचा रास्ता क्रॉस करून आम्ही डोंगराला भिडलो.आता सूर्यदेव पण वर येऊ लागले होते. खडा चढ असल्याने चांगलीच दमछाक होत होती. रात्रीच्या थकव्याने एकाचाबळी घेतला आणि गणेश ने विकेट टाकली. त्याने त्याचा निर्णय जाहीर केला आणि मागे थांबला. मग मी प्रवीण आणि ओंकार असे निघालो.
अर्धा ते पाऊण तासात आम्ही कड्याला भिडलो आणि नैसर्गिक कातळ पायऱ्या ओलांडून गडात प्रवेश केला. होय गडाची माचीच ति . गडाच्या पलीकडून कृष्णा नदी ओलांडून मंद आणि थंड वर आम्हास सुखावून गेला. वाई हे माझे आजोळ म्हणजे माझ्या आईचे गाव. क्षणभर मला आजीची आठवण झाली. वाई ला गेल्यावर आम्हास ती जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवायची. आत्तासुद्धा वाऱ्यामुळे तोच भास झाला. आम्ही वाईस गेल्यावर बऱ्याच वेळेस आमच्या मामा बरोबर किंवा मावशीबरोबर कृष्णा नदीच्या काठावर पाण्यात दगड मारत बसायचो आणि गडाकडे द्रीष्टीक्षेप टाकला जायचा, पण गडावर यायला इतका कालावधी जायला लागला.
माचीवर एका फूड प्रोसससिंग कंपनी चा बंगला कम रेस्टहॉउस आहे. त्यांच्या कृपाप्रसादाने पोटभर कांदेपोहे आणि गरम आणि गोड चहा मिळाला. तरतरी अली आणि आम्ही पुढे निघालो.
पांडवगड एक ऐतिहासिक महत्वाचा किल्ला आहे . शाहू महाराजांच्या काळात त्याला अनन्य साधारण महत्व होते. पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी पण तेथे आसरा घेतला होता (इति ग्रांट डफ). पण गडावर झाडझाडोरा फारच मजला आहे. कोयता घेतल्याशिवाय वर हिंडणे अशक्य. पाण्याचा एकमेव जिवंत साठा शिल्लक आहे. माचीवरन बालेकिल्ल्याकडे जाताना पाणी साठा उजवीकडे टाकून वर जावे. मुख्य प्रवेशदार अजून शिल्लक आहे.
प्रवेशद्वार
गडावरील काही अलीकडच्या काळातील बांधकामे ढासळलेल्या अवस्थेत अजुनी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. लवकर ह्यांच्याकडे लक्ष दिल नाही तर आपण ह्या ऐतिहासीक वारश्याला कायमचे मुकू.
गडावर काही प्राचीन गुफा आहेत त्याला भेट देण्यास विसरू नये.
संक्षिप्त: हा किल्ला साधारण १२ व्य शतकात कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने बांधला. साधारण १६७३ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला. कालांतराने वेगवेगळ्या राजवटीकडून शेवटी हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांकडे गेला. इंग्रजांच्या तर्फे मेजर थॅचर याने तो घेतला. सविस्तर माहिती करता महाजालाचा आसरा घ्या.
दुपारी १२ ते १ च्या दरम्यान हा किल्ला आम्ही उतरायला सुरवात केली. मार्च च्या रणरणत्या उन्हात गुंडेवाडी ला जेवण करून पुढे निघालो. गाडी असह्य तापली होती. आता लक्ष होते वैराट गड.
वैराटगड
वैराटगडाच्या पायथ्याचे गाव म्हसवे. गावात पोचलो चावडी पाशी गाडी पार्क केली आणि वर जायची वाट विचारली. पारावर बरीच लोक बसली होती. सर्वानी आम्हाला वेड्यात काढले कारण आम्ही त्या उन्हात गड चढणार होतो. एव्हाना आमच्याभोवती बरीच गर्दी गोळा झाली होतात आणि बऱ्याच जणांनी बऱ्याच वाटा दाखवल्या. गावातून निघून चढाईला लागताना पाण्याच्या टाकीपाशी भरपूर गर्दी दिसली आणि काही लोक उठून निघून जायलालागले , आणि बघतो तर काय तेथे पत्ते खेळणाऱ्या लोकांची जत्रा भरली होती. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे निघालो . उन्हाळ्यामुळे गवत वाळून कोळ जाहले होते आणि ढोर वाटा तयार होऊनवाटाच वाटा दिसत होत्या. आम्ही प्रवेश द्वाराच्या दिशेने मार्गक्रमण चालू ठेवले.
गड चढतांना एक लक्षात आले. प्रत्येक डोंगर रांगेचे एक एक वैशिष्ट्य असते. मातीचा पोतं वेगळा असतो. ह्या किल्ल्यावर चढताना घसारा फार होता. पाय टिकवणे मुश्किल होत होत. साधारण तासाभरात आम्ही कड्या जवळ पोचलो. मुख्य प्रवेशदारातून आत जायच्या आधी डाव्या बाजूस कड्याच्या पोटात पाण्याचा नैसर्गिक साठा आहे. पाणी अतिशय थंड आणि मधुर लागले. पाच मिनटात थकवा कुठच्या कुठे पळून गेला. बऱ्याच वेळानी फोन ला रेंज सुद्धा मिळाली आणि सर्वानी आपल्या घरी संपर्क साधला. आता वेध लागले होते गड फेरीचे.
गडाचा विस्तार मर्यादित असला तरी गड फार आटोपशीर आणि स्वच्छ आहे. बहुतेक एक जत्रा होऊन गेली होती. गडावर एक बांधीव मंदिर; एक मारुतीची मूर्ती उघड्यावर आणि काही वीरगळी आहेत. किल्लाच्या पूर्व तटावरून सातारा पुणे महामार्ग आणि त्यावरील मनमोहक वाहतूक दिसते. बरीच वर्षे मी पण या रस्त्यावरून किल्ल्याकडे न बघता निघून गेलो होतो.
प्रवेशदार
मालावरील मारुती
मारुतीचे मंदिर आणि वीरगळ:
पाणी साठा :
पाणीसाठा अजुनी चांगला आहे; थोडी डागडुजी केल्यास चांगला उपयोग होईल. बऱ्याच किल्ल्याने भेटी दिल्यावर लक्षात आलं कि आहेत त्या पाण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपल्या पूर्वजांनी आपल्या करता बऱ्याच सोयी करून ठेवल्या आहेत.
संक्षिप्त
किल्ला कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा, याने बांधला. पांडवांचे येथे वास्तव्य होते असेसांगितले जाते. .
संध्याकाळचे सहा वाजायला आले होते आणि अंधार पडायच्या आत खाली उतरून वारुगड गाठायचा होता. आणि हो उतरायचे आणिक टेन्शन होतेच - घसारा. दोन किल्ले झाल्याचा आनंद मनात साठवत उतरायला सुरवात केली. उतरताना एक सोपेअसते . फोटो काढायचे नसतात. लवकर उतरता येतं . अर्ध्या पाऊण तासात बेस ला आलो. चावडी च्या मागे जाऊन शाळेमध्ये नळावर मस्त अंघोळ केली. गुगल मॅप्स ने एक सोपं केलंय. ना रस्ता हुडकायची काळजी आणि हो केव्हा पोचू ते माहिती पडते. पाचवड ला मस्त चहा घेतला. सर्व प्रवासात पार्ले जी कामास येते. वारुगडला जाताना एक शोध लागला. ओंकार हा उत्तम ड्राइवर आहे. माझ्यावरचे टेन्शन कमी झाले.
वारुगड
घेरा वारुगड फार मोठा आहे. गाडीत ओंकार सोडून आम्ही सर्व झोपलो होतो. रात्रीच्या अंधारात एकदम माचीवर देवळाच्या बाजूला पोचलो. थंड वारे जोरात सुटले होते आणि पवनचक्कीचा आवाज पण येत होता. जेवण तर वाटेत कोरेगाव ला झाले होते. जेवणाच्या बरोबर गणेश च्या हॉटेल मालकाबरोबरच्या चौकश्या चालू होत्या. वेळ कसा गेला ते कळलेच नाही. त्या गप्पा ऐकून मला वाटले कि मी पण एक हॉटेल चालू करू शकेन. असो. रात्रीच्या मुक्कामाकरता बरोबर टेन्ट न्हेले होते. पण देवळाच्या गुरवाने आम्हाला देवळात झोपण्याची परवानगी दिली. सोने पे सुहागा म्हणतात तो हा. बघता बघता झोप लागली आणि आणखीन एका अद्भुत सकाळी जागे कसे झालो ते कळलेच नाही. आळोखे पिळोखे देत देवळाच्या बाहेर आलो. आणि बघतो तर काय मागच्या बाजूला हाताशी बालेकिल्ला. हा किल्ला त्याच्यावरच्या एकमेव झाडाकरता सुद्धा प्रसिद्ध आहे. आम्ही हा किल्ला एकदा पिलीव च्या गढी वरून ओळखला होता;इतक्या दूरवरून दिसतो, केवळ त्या झाडामुळे.
माचीवर दोन तीन घरे होती. नुकतीच गडाला जाग येऊ लागली होती. मला बाहेर बघून एकाने चहा पद्दल विचारले. आणि काय आम्हा सर्वांची कळी खुलली. त्याच्या कडे नाश्त्याचे पण पक्के केले. देवळाच्या बाहेर नळावर अंघोळ. आणखी काय पायजे. सुख म्हणतात ते हेच, जास्ती काही लागत नाही. चहा पिता पिता गडावरच्या रस्त्याचे विचारून घेतले. वारुगड हा माण तालुक्यात येतो, जो दुष्काळी म्हणून प्रसिद्ध आहे. गडावर काही ऐतिहासिक विहिरी आहेत आणि तेथील पाणी नियोजन उत्तम आहे, त्यातून खाली गावाला पाणी पुरवतात.
माचीवरील देवळाच्या मागच्या बाजूला वर जाण्याची वाट आहे. आम्ही विहीर बघून वर निघालो. पंधरा ते वीस मिनटात माथ्यावर पोचलो सुद्धा. वर जाताना मोडक्या तोडक्या पायऱ्या लागल्या. त्या थेट प्रवेश दारात घेऊन गेल्या.
संक्षिप्त: हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांचा प्रतिकार करण्यासाठी बांधला असावा असे मानले जाते किल्लेदार हे प्रभू होते. किल्ल्याच्या चौकीत 200 रामोशी, महार आणि इतर वंशपरंपरागत गडकरी शिपाई होते. १८१८ मध्ये साताराच्या राजाच्या विठ्ठल पंत फडणीस यांच्या ताब्यात किल्ला गेला. मराठे शाहीच्या अस्ताबरोबर किल्ला ब्रिटिशांकडे गेला.
गडावरील काही इतर दृश्ये:
आत्तापर्यंत प्लॅन केलेले सर्व मोठे किल्ले पाहून झाले होते. आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते. झटपट उतरून आम्ही फलटण मार्गे निघून परतीस लागलो. हा रस्ता सातारा पुणे महामार्गाला शिरवळच्या आधी मिळतो. मुख्य रस्त्याला लागल्यावर आयडिया निघाली कि वेळ आहे तर सुभानमंगळ का नको? हा किल्ला शिरवळ ला नीरा नदीच्या काठाला असून भुईकोट या प्रकारात मोडतो. श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्र या पुस्तकात याचे संदर्भ आहेत. शिरवळ जवळ पोचताच आम्ही विचारपूस चालू केली. याचे बऱ्याच लोकांना याची माहिती नाही वाईट वाटले. स्वराज्याची पहिली लढाई येथे लढली गेली होती.
असो रस्ता मिळाला आणि आम्ही १० मिनटात किल्याच्या जवळ पोचलो. सध्या येथे किल्ल्याचे फार मोजके अवशेष शिल्लक आहेत. ते पण काही दिवसात लुप्त होतील अशी भीती वाटते. सर्व गडाप्रमींना विनंती कि त्यांनी लवकरात लवकर हा किल्ला बघून घ्यावा.
संक्षिप्त
आदिलशहाचा वजीर मुस्तफ़ाखानाने २५ जुलै १६४८ रोजी शहाजी राजांना बेसावध गाठुन कैद केले. त्याबरोबर आदिलशहाने शिवाजी महाराजांचे परिपत्य करण्यासाठी फ़तेहखानाला पाठवल. त्यावेळी स्वराज्याचा आकार लहान होता. स्वराज्यात शिरुन त्याची नासधुस करु नये म्हणुन शत्रूला आपल्या स्वराज्यात शिरु द्यायच नाही असा विचार करून महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुरंदर किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर हे युध्द क्षेत्र ठरवण्यात आल. महाराज पुरंदरवर असल्याने फ़तेहखानाने पुरंदरच्या जवळ बेलसरला छावणी टाकली आणि बाळाजी हैबतरावांना शिरवळच्या किल्ला घेण्यासाठी पाठवले. महाराजांचे सैन्य कमी होते. त्यांना सैन्याची हानीही करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी विशेष प्रतिकार न करता किल्ला फ़तेखानाच्या स्वाधिन केला. सुभान मंगळ सहजासहजी हाती आल्याने बाळाजी हैबतराव बेफ़िकीर राहीला. दुसर्या दिवशी पहाटेच कावजी मल्हार खासनीस या सरदाराला महाराजांनी सुभानमंगळ घेण्यास पाठवले. त्याने किल्ल्याचा तट फ़ोडुन किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफ़िल शत्रूवर हल्ला करुन किल्ला जिंकुन घेतला.
गडावरील पाहण्याची ठिकाणे खालील प्रमाणे आहेत.
किल्ल्याचे बुरुज अथवा तटबंदी याची फार थोडी नामोनिशाणी शिल्लक उरलेली आहे. याचा उपयोग सध्या प्रेमी युगुले सुद्धा करतात.
थोडयाफार खिन्न मानाने आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. संध्याकाळच्या सुमारास खारघरला आमची मोहीम समाप्त झाली.
धन्यवाद.
आपला अभिप्राय जरूर द्या.


























